मॅगी मसाला राइस

शुक्रवार होता आणि मी नेहमीप्रमाणे पूर्ण स्वयंपाकाला सुट्टी देऊन काही तरी सुटसुटीत आणि चविष्ट करायच्या बेतात होते. इंटरनेट वर माझा शोध चालू होता. माझ्या आवडत्या चकली वर काही मिळतं का बघत होते, आणि एक रेसिपी मला मिळाली ती होती सिंगापूर नूडल्स राइस, पण अडचण अशी होती कि त्यातलं बरचसं साहित्य माझ्याकडे नव्हतं तरी मला तीच रेसिपी करायची होती. मग माझ्याकडे त्यातलं जे साहित्य होतं ते घेऊन आणि जे नव्हतं त्याला पर्याय शोधून (माझ्या नवऱ्याने सुचवलेले ;)) मी जी पाककृती केली ती मी इथे देत आहे.

साहित्य :
१ वाटी तांदूळ
१ पॅकेट मॅगी नूडल्स
१/४ वाटी चिरलेलं गाजर (चौकोनी छोटे तुकडे)
१ छोटा उभा बारिक चिरलेला कांदा
१/४ वाटी हिरवे वाटाणे
१/४ वाटी स्वीटकॉर्न
२ ते ३ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
१ इंच आले किसून
२ पाकळ्या लसूण किसून
मसाला (मॅगीच्या पॅकेट मधील)
सोया सॉस १ ते २ चमचे
मीठ चवीनुसार
मिरी पूड चवीनुसार
२ चमचे ऑलिव्ह ऑइल

कृती :
१) तांदूळ धुवून त्यातले पाणी पूर्ण निथळून घ्यावे. तांदळाच्या चौपट पाणी पातेल्यात उकळावे, त्यात थोडे मीठ घालावे. पाणी उकळायला लागल्यावर त्यात तांदूळ घालून मोठ्या आचेवर शिजेपर्यंत ठेवावे. पाणी पूर्ण आटू न देता तांदुळ शिजले की गॅसवरून उतरून उरलेले पाणी लगेच काढुन टाकावे.
२) मॅगी  नूडल्स नेहमीप्रमाणे पण मसला न घालता नुसत्या शिजवून घ्याव्यात.
३) मध्यम आचेवर एका पसरट भांड्यात एक चमचा ऑलिव्ह ऑइल घालावे, त्यात आलं, लसूण टाकून थोडे परतावे. नंतर कांदा घालून तो गुलाबी होइपर्यंत परतावा, मग मिरच्या टाकाव्यात. नंतर सर्व भाज्या टाकून मिनीटभर परताव्यात. परतलेल्या भाज्यांमधे १ चमचा ऑलिव्ह ऑइल  घालून थोडावेळ गरम होऊ द्यावे.
४) आता त्यामधे मॅगी  मसाला घालून परतावे. नंतर भात,सोया सॉस, मिरीपूड घालून पून्हा परतावे. सर्वात शेवटी शिजलेल्या नूडल्स घालून व्यवस्थित एकजीव होईल असे परतून घ्यावे व गरमागरम भात सर्व्ह करावा.

Advertisements