टॉवर ऑफ लंडन

काल जवळजवळ एक महिन्यानी मी क्रॉयडनच्या बाहेर जात होते फिरायला! थंडी आणि पाऊस यामुळे गेले काही शनिवार, रविवार आम्ही कुठे फिरायला बाहेर पडलो नव्हतो. काल अचानक आमचं टॉवर ऑफ लंडन बघायला जायचं ठरलं आणि आम्ही १०.३० च्या आसपास बाहेर पडलो. पावसाची रिपरीप सुरुच होती पण बरेच दिवसानी बाहेर पडलो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोहिनूर ज्याच्याबद्दल फक्त वाचायला आणि ऐकायला मिळतं तो आज प्रत्यक्षात बघायला मिळणार होता याचा उत्साह होता. या उत्साहात आम्ही  टॉवर ऑफ लंडनला पोहचलो. एंन्ट्री फि, तिकिट या सगळ्याचे सोपस्कार आटोपून एकदाचे आम्ही टॉवर ऑफ लंडन म्हणजे त्या किल्ल्यात शिरलो. टॉवर ऑफ लंडन ची माहिती द्यायला तिथे गाइड आहे जो सुरवातीला तुम्हाला त्या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास सांगतो, तिथल्या अनेक टॉवर बद्दल माहिती देतो. नंतर आपण तो किल्ला आणि तिथले टॉवर आतून फिरून बघायचे.  त्याची सांगण्याची पध्दत इतकी मस्त आणि मजेदार होती कि त्याच बोलण ऐकत रहावं असं वाटतं होत.

Tower of London

Tower of London

टॉवर ऑफ लंडन हा बऱ्याच छोट्या मोठ्या टॉवरनी बनलेला किल्ला आहे जो थेम्स नदीच्या किनारी इ.स. १०७८ साली बांधला आहे. हा किल्ला व्हाइट टॉवर म्हणूनही ओळखला जातो. ह्या किल्ल्याच्या अग्रभागी असणाऱ्या पांढऱ्या टॉवरवरून हि ओळख निर्माण झाली. हा किल्ला मुख्यत्त्वे तुरूंग म्हणून वापरला जायचा. इथे बऱ्य़ाच राजघराण्यातील व्यक्तिंना बंदिवान म्हणून ठेवल गेल, मृत्यूची शिक्षा दिली गेली, त्यांचा शिरच्छेद केला गेला. इथे छोटे मोठे एकूण २०-२१ टॉवर आहेत (गाइडने दोनदा सांगितलं तरी मी नक्की संख्या विसरले :(). सर्वात प्रथम आम्ही क्राउन ज्युवेल्स ठेवलेल्या इमारतीमध्ये (वॉटर्लू ब्लॉक) शिरलो. तिथे सर्व किंमती दागिने ठेवले आहेत जे पूर्वीपासून राज्याभिषेकासाठी (कोरोनेशनसाठी) वापरले गेले आहेत. यामध्ये सर्व सोन्याचांदीची भांडी, हिऱ्य़ांचे दागिने, हिऱ्यामोत्यानी सजवलेली शाही तलवार असं बरंच काही आहे (जे आपण फक्त आ वासून बघत राहतो). ह्यामधे कोहिनूर हिरा जो सध्या क्वीन मदरच्या क्राऊनमधे आहे, जगातला पहिला सापडलेला सर्वात मोठा कलिनल १ हिरा ज्याला फर्स्ट स्टार ऑफ आफ्रिका म्हटलं जात आणि जो सध्या शाही सेप्टर मधे बंदिस्त आहे. अशा सगळ्या अगणित किंमती हिऱ्य़ांना बघून, आणि खरंतर आपल्या भारताच्या (जो आता भारताचा नाही रहिला) कोहिनूर हिऱ्याला पाहून मस्त वाटलं.

हे सगळे दागदागिने मनसोक्त पाहून आम्ही व्हाइट टॉवर मधे गेलो. सर्वात पहिला बांधलेला आणि सर्वात मध्यभागी असणारा हा टॉवर आहे. ह्यावरूनच टॉवर ऑफ लंडनला व्हाइट टॉवर म्हटलं जातं. हा तिथला सगळ्यात मोठा टॉवर आहे. हा टॉवर विल्यम नावाच्या नॉर्मन राजाने बांधला आहे. या टॉवरच्या सगळ्यात शेवटच्या मजल्यावर शाहिपरिवार रहात असे. सध्या या टॉवरमधे पूर्वी वापरली जाणारी आयुधे जसे बंदूक, तोफा, तलवारी, पूर्वीची नाणी आणि टॉवर ऑफ लंडनची पहिल्या इमारतीपासून आतापर्यंतच्या बांधकामाच्या प्रतिकृती आहेत. त्यानंतर आम्ही वेकफिल्ड टॉवरमधे गेलो तिथून लंन्थॉर्न टॉवर, कॉन्स्टेबल टॉवर, सॉल्ट टॉवर असे काही टॉवर जे व्हाइट टॉवरच्या बाजूने बांधले आहेत ते पाहिले. तिथे रेवन नावाचा एक पक्षी  (मोठा कावळा?) आहे ज्याच्याबद्दल आम्हाला गाइडने एक कथा सांगितली ती अशी की हा पक्षी जर इथून गेला तर साम्राज्य आणि टॉवर दोन्ही नष्ट होतील. हे उडून जाऊ नयेत म्हणून त्यांची काही पिसे काढली जातात. हा पक्षी जर इथे राहिला तर तो जवळपास ३० वर्षे जगतो, बाहेर या पक्ष्याचे आयुर्मान फक्त १५ वर्षे असते.

हे सगळं बघत असताना आम्हाला भुकेची जाणीवच राहिली नव्हती, पण आता ती होत होती. अशाप्रकारे इतिहासाचा एक मोठा साक्षीदार असलेला, सुंदर बांधकामाचा एक नमूना असलेला आणि व्यवस्थित जतन करून ठेवलेला असा किल्ला “टॉवर ऑफ लंडन” बघून आम्ही आमची पोटपूजा करायला तिकडून बाहेर पडलो.

Advertisements

लीक, पोटॅटो सूप

लीक

मी इकडे बरेच भाज्यांचे प्रकार बघते जे आपल्याकडे मिळत नाहीत आणि मिळत असले तरी ते काही ठराविक ठिकाणी मिळतात. मी तर यातले बरेचसे प्रकार इकडे आल्यावरच बघितले आहेत. जसं, लीक या भाजीच दुसरं नाव किंवा शास्त्रीय नाव आहे अलियम पोरम (Allium porrum). ही कांदा जातीच्या भाज्यांमधे येणारी भाजी आहे. दिसायला अगदी पातीच्या कांद्यासारखी, फरक एकच पातीच्या कांद्याची एक जुडी म्हणजे एक लीक :). कुणी पहिल्यांदा पाहिलं तर मनात नक्की विचार येणार “अरे, एवढा मोठा पातीचा कांदा!” पण ह्या भाजीला मोठा पातीचा कांदा म्हणायला काही हरकत नाही. त्याच जातीची भाजी आणि चवीला तर जवळपास पातीच्या कांद्यासारखीच.लीकचं मूळ मेडिटेरिअन रिजन, मध्य आशिया मानलं जातं. तिकडून लीक पूर्ण युरोप, अमेरिका खंडापर्यंत पोहचले. लीकमधे विटॅमिन के आणि मॅन्गनीज भरपूर प्रमाणात मिळतं. तसचं विटॅमिन सी, बी६ आणि आयर्नही लीकमधून मिळतं. लीकचा वापर बऱ्याच प्रमाणात सूप बनवण्यासाठी केला जातो. त्याचा आणखीही वेगळ्या प्रकारे वापर केला जातो पण लीकच सूप मस्त लागतं.

मी लीक आणि बटाट वापरून सूप बनवलं होत त्याची रेसिपी खालील प्रकारे आहे.

साहित्य :
१ लीक
२ मध्यम बटाटे
१ ते २ चमचे बटर
१ कप वेजिटेबल स्टॉक (नसल्यास पाणी चालेल)
१ चमचा फ्रेश क्रिम
मीठ चवीनुसार
मिरी पूड चवीनुसार

कृती :
१) लीक आणि बटाटे चिरून घ्यावेत. एका पातेल्यात बटर घेऊन त्यात लीक आणि बटाटे मध्यम आचेवर परतावेत.
२) आता त्यात वेजिटेबल स्टॉक किंवा पाणी घालून लीक आणि बटाटे शीजू द्यावेत. ते शिजल्यावर त्यात फ्रेश क्रिम घालावे आणि ब्लेंडरमधे फिरवून घ्यावे.
३) पून्हा पातेल्यात घेऊन, त्यात चवीनुसार मीठ, मिरीपूड घालून हे मिश्रण गरम करावे. गरमागरम लीक, पोटॅटो सूप तयार.

बटरनट स्क्वॅश सूप

शनिवार आणि रविवार या दोन दिवशी मी मस्त हव्या त्या रेसिपीचे प्रयोग करू शकते. हे दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे  कसलीच गडबड नसते आणि काहितरी नविन, चवदार, सोपा पदार्थ केल्याचा आनंदही मिळतो. तर सध्या मी बऱ्य़ाच सूपच्या रेसिपी करून बघती आहे, त्यातल्या काही कृती मी इथे देते आहे.

साहित्य :
अर्ध्या बटरनट स्क्वॅशचे चौकोनी तुकडे
१ कांदा
१ इंच आलं
१ ते २ चमचे बटर
१ चमचा ऑलिव्ह ऑइल
१ कप वेजिटेबल स्टॉक (नसल्यास पाणी चालेल)
१ चमचा फ्रेश क्रिम
मीठ चवीनुसार
मिरी पूड चवीनुसार

कृती :
१) एका पातेल्यात बटर आणि ऑलिव्ह ऑइल टाकून त्यात आलं, कांदा व बटरनट स्क्वॅशचे तुकडे मंद आचेवर २ ते ३ मिनिट परतावे.
२) आता त्यात वेजिटेबल स्टॉक किंवा पाणी घालून बटरनट स्क्वॅश शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवावे.
३) बटरनट स्क्वॅश शिजत आल्यावर त्यात फ्रेश क्रिम घालून सर्व मिश्रण ब्लेंडर मधे फिरवून घ्यावे. आता त्यात चवीनुसार मीठ आणि मिरीपूड टाकून ते मिश्रण गरम करावे. गरमागरम बटरनट स्क्वॅश सूप तयार.