लीक, पोटॅटो सूप

लीक

मी इकडे बरेच भाज्यांचे प्रकार बघते जे आपल्याकडे मिळत नाहीत आणि मिळत असले तरी ते काही ठराविक ठिकाणी मिळतात. मी तर यातले बरेचसे प्रकार इकडे आल्यावरच बघितले आहेत. जसं, लीक या भाजीच दुसरं नाव किंवा शास्त्रीय नाव आहे अलियम पोरम (Allium porrum). ही कांदा जातीच्या भाज्यांमधे येणारी भाजी आहे. दिसायला अगदी पातीच्या कांद्यासारखी, फरक एकच पातीच्या कांद्याची एक जुडी म्हणजे एक लीक :). कुणी पहिल्यांदा पाहिलं तर मनात नक्की विचार येणार “अरे, एवढा मोठा पातीचा कांदा!” पण ह्या भाजीला मोठा पातीचा कांदा म्हणायला काही हरकत नाही. त्याच जातीची भाजी आणि चवीला तर जवळपास पातीच्या कांद्यासारखीच.लीकचं मूळ मेडिटेरिअन रिजन, मध्य आशिया मानलं जातं. तिकडून लीक पूर्ण युरोप, अमेरिका खंडापर्यंत पोहचले. लीकमधे विटॅमिन के आणि मॅन्गनीज भरपूर प्रमाणात मिळतं. तसचं विटॅमिन सी, बी६ आणि आयर्नही लीकमधून मिळतं. लीकचा वापर बऱ्याच प्रमाणात सूप बनवण्यासाठी केला जातो. त्याचा आणखीही वेगळ्या प्रकारे वापर केला जातो पण लीकच सूप मस्त लागतं.

मी लीक आणि बटाट वापरून सूप बनवलं होत त्याची रेसिपी खालील प्रकारे आहे.

साहित्य :
१ लीक
२ मध्यम बटाटे
१ ते २ चमचे बटर
१ कप वेजिटेबल स्टॉक (नसल्यास पाणी चालेल)
१ चमचा फ्रेश क्रिम
मीठ चवीनुसार
मिरी पूड चवीनुसार

कृती :
१) लीक आणि बटाटे चिरून घ्यावेत. एका पातेल्यात बटर घेऊन त्यात लीक आणि बटाटे मध्यम आचेवर परतावेत.
२) आता त्यात वेजिटेबल स्टॉक किंवा पाणी घालून लीक आणि बटाटे शीजू द्यावेत. ते शिजल्यावर त्यात फ्रेश क्रिम घालावे आणि ब्लेंडरमधे फिरवून घ्यावे.
३) पून्हा पातेल्यात घेऊन, त्यात चवीनुसार मीठ, मिरीपूड घालून हे मिश्रण गरम करावे. गरमागरम लीक, पोटॅटो सूप तयार.

Advertisements

बटरनट स्क्वॅश सूप

शनिवार आणि रविवार या दोन दिवशी मी मस्त हव्या त्या रेसिपीचे प्रयोग करू शकते. हे दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे  कसलीच गडबड नसते आणि काहितरी नविन, चवदार, सोपा पदार्थ केल्याचा आनंदही मिळतो. तर सध्या मी बऱ्य़ाच सूपच्या रेसिपी करून बघती आहे, त्यातल्या काही कृती मी इथे देते आहे.

साहित्य :
अर्ध्या बटरनट स्क्वॅशचे चौकोनी तुकडे
१ कांदा
१ इंच आलं
१ ते २ चमचे बटर
१ चमचा ऑलिव्ह ऑइल
१ कप वेजिटेबल स्टॉक (नसल्यास पाणी चालेल)
१ चमचा फ्रेश क्रिम
मीठ चवीनुसार
मिरी पूड चवीनुसार

कृती :
१) एका पातेल्यात बटर आणि ऑलिव्ह ऑइल टाकून त्यात आलं, कांदा व बटरनट स्क्वॅशचे तुकडे मंद आचेवर २ ते ३ मिनिट परतावे.
२) आता त्यात वेजिटेबल स्टॉक किंवा पाणी घालून बटरनट स्क्वॅश शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवावे.
३) बटरनट स्क्वॅश शिजत आल्यावर त्यात फ्रेश क्रिम घालून सर्व मिश्रण ब्लेंडर मधे फिरवून घ्यावे. आता त्यात चवीनुसार मीठ आणि मिरीपूड टाकून ते मिश्रण गरम करावे. गरमागरम बटरनट स्क्वॅश सूप तयार.

मॅगी मसाला राइस

शुक्रवार होता आणि मी नेहमीप्रमाणे पूर्ण स्वयंपाकाला सुट्टी देऊन काही तरी सुटसुटीत आणि चविष्ट करायच्या बेतात होते. इंटरनेट वर माझा शोध चालू होता. माझ्या आवडत्या चकली वर काही मिळतं का बघत होते, आणि एक रेसिपी मला मिळाली ती होती सिंगापूर नूडल्स राइस, पण अडचण अशी होती कि त्यातलं बरचसं साहित्य माझ्याकडे नव्हतं तरी मला तीच रेसिपी करायची होती. मग माझ्याकडे त्यातलं जे साहित्य होतं ते घेऊन आणि जे नव्हतं त्याला पर्याय शोधून (माझ्या नवऱ्याने सुचवलेले ;)) मी जी पाककृती केली ती मी इथे देत आहे.

साहित्य :
१ वाटी तांदूळ
१ पॅकेट मॅगी नूडल्स
१/४ वाटी चिरलेलं गाजर (चौकोनी छोटे तुकडे)
१ छोटा उभा बारिक चिरलेला कांदा
१/४ वाटी हिरवे वाटाणे
१/४ वाटी स्वीटकॉर्न
२ ते ३ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
१ इंच आले किसून
२ पाकळ्या लसूण किसून
मसाला (मॅगीच्या पॅकेट मधील)
सोया सॉस १ ते २ चमचे
मीठ चवीनुसार
मिरी पूड चवीनुसार
२ चमचे ऑलिव्ह ऑइल

कृती :
१) तांदूळ धुवून त्यातले पाणी पूर्ण निथळून घ्यावे. तांदळाच्या चौपट पाणी पातेल्यात उकळावे, त्यात थोडे मीठ घालावे. पाणी उकळायला लागल्यावर त्यात तांदूळ घालून मोठ्या आचेवर शिजेपर्यंत ठेवावे. पाणी पूर्ण आटू न देता तांदुळ शिजले की गॅसवरून उतरून उरलेले पाणी लगेच काढुन टाकावे.
२) मॅगी  नूडल्स नेहमीप्रमाणे पण मसला न घालता नुसत्या शिजवून घ्याव्यात.
३) मध्यम आचेवर एका पसरट भांड्यात एक चमचा ऑलिव्ह ऑइल घालावे, त्यात आलं, लसूण टाकून थोडे परतावे. नंतर कांदा घालून तो गुलाबी होइपर्यंत परतावा, मग मिरच्या टाकाव्यात. नंतर सर्व भाज्या टाकून मिनीटभर परताव्यात. परतलेल्या भाज्यांमधे १ चमचा ऑलिव्ह ऑइल  घालून थोडावेळ गरम होऊ द्यावे.
४) आता त्यामधे मॅगी  मसाला घालून परतावे. नंतर भात,सोया सॉस, मिरीपूड घालून पून्हा परतावे. सर्वात शेवटी शिजलेल्या नूडल्स घालून व्यवस्थित एकजीव होईल असे परतून घ्यावे व गरमागरम भात सर्व्ह करावा.