टॉवर ऑफ लंडन

काल जवळजवळ एक महिन्यानी मी क्रॉयडनच्या बाहेर जात होते फिरायला! थंडी आणि पाऊस यामुळे गेले काही शनिवार, रविवार आम्ही कुठे फिरायला बाहेर पडलो नव्हतो. काल अचानक आमचं टॉवर ऑफ लंडन बघायला जायचं ठरलं आणि आम्ही १०.३० च्या आसपास बाहेर पडलो. पावसाची रिपरीप सुरुच होती पण बरेच दिवसानी बाहेर पडलो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोहिनूर ज्याच्याबद्दल फक्त वाचायला आणि ऐकायला मिळतं तो आज प्रत्यक्षात बघायला मिळणार होता याचा उत्साह होता. या उत्साहात आम्ही  टॉवर ऑफ लंडनला पोहचलो. एंन्ट्री फि, तिकिट या सगळ्याचे सोपस्कार आटोपून एकदाचे आम्ही टॉवर ऑफ लंडन म्हणजे त्या किल्ल्यात शिरलो. टॉवर ऑफ लंडन ची माहिती द्यायला तिथे गाइड आहे जो सुरवातीला तुम्हाला त्या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास सांगतो, तिथल्या अनेक टॉवर बद्दल माहिती देतो. नंतर आपण तो किल्ला आणि तिथले टॉवर आतून फिरून बघायचे.  त्याची सांगण्याची पध्दत इतकी मस्त आणि मजेदार होती कि त्याच बोलण ऐकत रहावं असं वाटतं होत.

Tower of London

Tower of London

टॉवर ऑफ लंडन हा बऱ्याच छोट्या मोठ्या टॉवरनी बनलेला किल्ला आहे जो थेम्स नदीच्या किनारी इ.स. १०७८ साली बांधला आहे. हा किल्ला व्हाइट टॉवर म्हणूनही ओळखला जातो. ह्या किल्ल्याच्या अग्रभागी असणाऱ्या पांढऱ्या टॉवरवरून हि ओळख निर्माण झाली. हा किल्ला मुख्यत्त्वे तुरूंग म्हणून वापरला जायचा. इथे बऱ्य़ाच राजघराण्यातील व्यक्तिंना बंदिवान म्हणून ठेवल गेल, मृत्यूची शिक्षा दिली गेली, त्यांचा शिरच्छेद केला गेला. इथे छोटे मोठे एकूण २०-२१ टॉवर आहेत (गाइडने दोनदा सांगितलं तरी मी नक्की संख्या विसरले :(). सर्वात प्रथम आम्ही क्राउन ज्युवेल्स ठेवलेल्या इमारतीमध्ये (वॉटर्लू ब्लॉक) शिरलो. तिथे सर्व किंमती दागिने ठेवले आहेत जे पूर्वीपासून राज्याभिषेकासाठी (कोरोनेशनसाठी) वापरले गेले आहेत. यामध्ये सर्व सोन्याचांदीची भांडी, हिऱ्य़ांचे दागिने, हिऱ्यामोत्यानी सजवलेली शाही तलवार असं बरंच काही आहे (जे आपण फक्त आ वासून बघत राहतो). ह्यामधे कोहिनूर हिरा जो सध्या क्वीन मदरच्या क्राऊनमधे आहे, जगातला पहिला सापडलेला सर्वात मोठा कलिनल १ हिरा ज्याला फर्स्ट स्टार ऑफ आफ्रिका म्हटलं जात आणि जो सध्या शाही सेप्टर मधे बंदिस्त आहे. अशा सगळ्या अगणित किंमती हिऱ्य़ांना बघून, आणि खरंतर आपल्या भारताच्या (जो आता भारताचा नाही रहिला) कोहिनूर हिऱ्याला पाहून मस्त वाटलं.

हे सगळे दागदागिने मनसोक्त पाहून आम्ही व्हाइट टॉवर मधे गेलो. सर्वात पहिला बांधलेला आणि सर्वात मध्यभागी असणारा हा टॉवर आहे. ह्यावरूनच टॉवर ऑफ लंडनला व्हाइट टॉवर म्हटलं जातं. हा तिथला सगळ्यात मोठा टॉवर आहे. हा टॉवर विल्यम नावाच्या नॉर्मन राजाने बांधला आहे. या टॉवरच्या सगळ्यात शेवटच्या मजल्यावर शाहिपरिवार रहात असे. सध्या या टॉवरमधे पूर्वी वापरली जाणारी आयुधे जसे बंदूक, तोफा, तलवारी, पूर्वीची नाणी आणि टॉवर ऑफ लंडनची पहिल्या इमारतीपासून आतापर्यंतच्या बांधकामाच्या प्रतिकृती आहेत. त्यानंतर आम्ही वेकफिल्ड टॉवरमधे गेलो तिथून लंन्थॉर्न टॉवर, कॉन्स्टेबल टॉवर, सॉल्ट टॉवर असे काही टॉवर जे व्हाइट टॉवरच्या बाजूने बांधले आहेत ते पाहिले. तिथे रेवन नावाचा एक पक्षी  (मोठा कावळा?) आहे ज्याच्याबद्दल आम्हाला गाइडने एक कथा सांगितली ती अशी की हा पक्षी जर इथून गेला तर साम्राज्य आणि टॉवर दोन्ही नष्ट होतील. हे उडून जाऊ नयेत म्हणून त्यांची काही पिसे काढली जातात. हा पक्षी जर इथे राहिला तर तो जवळपास ३० वर्षे जगतो, बाहेर या पक्ष्याचे आयुर्मान फक्त १५ वर्षे असते.

हे सगळं बघत असताना आम्हाला भुकेची जाणीवच राहिली नव्हती, पण आता ती होत होती. अशाप्रकारे इतिहासाचा एक मोठा साक्षीदार असलेला, सुंदर बांधकामाचा एक नमूना असलेला आणि व्यवस्थित जतन करून ठेवलेला असा किल्ला “टॉवर ऑफ लंडन” बघून आम्ही आमची पोटपूजा करायला तिकडून बाहेर पडलो.

Advertisements

मिशलिन स्टार

इकडे लंडनमधे बरेचदा रेस्टॉरंट्सशी संबधित एक विशेषण ऐकायला मिळतं, “मिशलिन स्टार”. ३ स्टार, ५ स्टार हे मी ऐकलं होतं पण मिशलिन स्टार हे माझ्यासाठी नवीन होतं, मग हा काय प्रकार आहे हे मी आंतरजालावर पहायच ठरवलं आणि त्यातून मला जे मिळाल ते मी इकडे थोडक्यात लिहिते आहे.

मिशलिन स्टारचं उगमस्थान आहे मिशलिन गाईड जे मिशलिनतर्फे प्रकाशित होतं. मिशलिन ही फ्रान्सची जगातील एक मोठी टायर निर्माती कंपनी आहे जी मिशेल ब्रदर्सनी १८८८ मधे सुरू केली. मिशलिन गाईड ही जगातल्या मोठ्या मोठ्या देशांवर लिहिलेली पुस्तके आहेत ज्यामध्ये गाडी चालकांसाठी गाडीच्या संदर्भात उपयोगी माहिती, प्रवासादरम्यान लागणाऱ्या राहाण्या, खाण्याच्या व्यवस्थेसंदर्भात मार्गदर्शन, पर्यटन इ. संदर्भात लिहील जातं. हे गाईड प्रथम फ्रान्स या देशाबद्दल लिहीलं गेलं. त्यामधे मिशलिन रेड गाईड आणि मिशलिन ग्रीन गाईड असे दोन प्रकार आहेत, त्यातील मिशलिन रेड गाईड, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स ना त्यांच्या जेवणाच्या दर्जानुसार मिशलिन स्टार बहाल करतं. मिशलिन रेड गाईड कडून निनावी परिक्षण केलं जातं आणि त्याच्या आधारावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स ना स्टार बहाल केला जातो. तो दर्जा, स्तर तसाच रहावा यासाठी त्यांच्याकडून दर १८ महिन्यानी स्टार दिलेल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी केली जाते. हे सर्व गाड्यांच्या मालकांसाठी, गाड्यांच्या इतर माहितीसोबत प्रवासादरम्यान जेवण्याखाण्याचीही योग्य माहिती मिळावी हा यामागचा हेतू.

हे गाईड १९०० पासून प्रकाशित केलं जाऊ लागलं आणि १९२६ पासून स्टार देण्याची पद्धत सुरू झाली. सुरवातीला चांगल्या जेवणाच्या आधारावर फ़क्त १ स्टार दिला जायचा, २ आणि ३ स्टार द्यायला १९३० च्या दरम्यान सुरवात झाली, १९५५ नंतर जेवणाच्या किंमतीही ग्राह्य धरल्या जाऊ लागल्या. सध्या जेवणाच्या श्रेष्ठतेच्या तसेच उचित किंमतीत चांगलं जेवण या आधारावर १ ते ३ मिशलिन स्टार दिले जातात. उचित किंमतीत चांगल जेवण देणाऱ्या  हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना “बिग गोरमांड(Big Gourmand)” अस संबोधन दिल जातं. तर जी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स स्टार किंवा बिग गोरमांड या प्रकारात बसत नाहीत त्याना “फोर्क्स ऍंड नाइव्स” हे मोजमाप लावल जात. १ फोर्क्स ऍंड नाइव्स म्हणजे बऱ्यापैकी  रेस्टॉरंट तर ५ फोर्क्स ऍंड नाइव्स हे एकदम मस्त रेस्टॉरंट, त्यात आणखी  भर म्हणजे जर फोर्क्स ऍंड नाइव्स लाल असतील तर ते रेस्टॉरंट आरामशीर आहे अस समजावं. पण ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघर, जे त्यांच्या नियमानुसार एकदम व्यवस्थित, स्वच्छ असलं पाहिजे. ह्या शिवाय हॉटेल्स आणि रेस्टॉरंट स्वतंत्ररीत्या दुसरी काही रेटिंग्स मिळवू शकतात जस “कॉइन्स” जे मेन्युच्या किंमतीवरून दिलं जातं. तसच इटरेस्टिंग व्ह्यु किंवा मग्निफ़ि्शियंट व्ह्यु ज्यासाठी काळा किंवा लाल रंग दिला जातो जो त्या हॉटेलच्या भोवतीच्या नजाऱ्यावरून ठरवला जातो. तसच उच्चप्रतीची आणि चांगली वाईन देणाऱ्या रेस्टॉरंट्सना द्राक्षांचं मानांकन दिलं जातं.

ह्या मिशलिन रेटिंग पद्धतीवर टीकाही केलेली आढळते. एक कारण असं की मिशलिन गाईडचा उगम फ्रान्समधला असल्यामुळे ह्या गाईडच्या रेटिंग पद्धती फ्रेंच जेवणाशी आणि सादरीकरणाशी निगडीत आहेत अस अमेरीकन जेवण समीक्षकांच(फ़ुड क्रिटिक) मत आहे. सध्या या लाल रंगाची गाईड्स फ़्रान्स, ऑस्ट्रिया, नेदरलॅंड्स, बेल्जियम, इट्ली, जर्मनी, युके ऍंड आर्यलॅंड, स्पेन, स्वित्झरलॅंड या देशांवर प्रकाशित झालेली आहेत. तर युरोपच्या बाहेर ती न्यूयॉर्क सिटी, सॅन्फ्रान्सिस्को, टोकियो, लास वेगास आणि लॉस ऍंन्जल्स साठी प्रकाशित झाली आहेत. नुकतीच ती हॉंगकॉंग आणि मकाऊ साठी सुद्धा प्रकाशित झाली आहेत. एकूणच हे मिशलिन स्टार म्हणजे एक वेगळच रसायन आहे असं वाचताना जाणवत होते.